Maharashtra Politics: “शिवसेना काँग्रेसच्या दावणीला, एक दिवस ठाकरे राहुल गांधींसारखे सावरकरांबद्दल विधाने करतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:35 PM2022-11-17T19:35:09+5:302022-11-17T19:36:02+5:30
Maharashtra News: सावरकरांवरील विधानानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण आदित्य ठाकरेंना तिथे पाठवले, अशी टीका भाजपने केली आहे.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. भाजप, शिंदे गट आणि मनसे या प्रकरणी आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राहुल गांधींप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल विधाने करतील, असा मोठा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राहुल गांधी आक्षेपार्ह वक्तव्य करतायात. त्याचे समर्थन काँग्रेस पक्ष करत आहे. स्वातंत्र्याचा इतिहास माहित असूनही तो दडपून टाकत काँग्रेसने आज आपली या देशाविषयी घृणा निर्माण केली आहे. हा देश त्यांना कधी माफ करणार नाही. जनता त्यांना माफ करणार नाही. राहुल गांधींनी जे काही एक-दोन टक्के या यात्रेतून कमावले होते. ते या वक्तव्यानंतर गमावले आहे, या शब्दांत बावनकुळे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
राहुल गांधींनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी प्रतिमेचे पूजन केले नाही
उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे, ते पाहता एक दिवस ते स्वतः सावरकरांबद्दल आज राहुल गांधी जे बोलतायत, तसेच वक्तव्य करतील. राजीव गांधी यांच्या जयंती किंवा पुण्यतिथीला उद्धव ठाकरे आदरांजली वाहतात. पण राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी कुठेही त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलेले दिसून आले नाही. त्यांच्याबद्दल चार शब्दही ते बोलले नाहीत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष काँग्रेसला वेठीस धरला आहे. सावरकरांबद्दल असे वक्तव्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भारत जोडो यात्रेवर बहिष्कार टाकायला हवा होता. पण त्यांनी आदित्य ठाकरेंना तिथे पाठवले. एक दिवस उद्धव ठाकरे काँग्रेससारखेच बोलतील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, राहुल गांधींनी देशाचा अपमान केला आहे. सावरकरांबद्दल त्यांचे हे वक्तव्य कुणीही सहन करू शकणार नाही. भाजप याचा तीव्र निषेध करणार आहे. त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची माफी मागितली पाहिजे, राहुल गांधींवर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"