Chandrashekhar Bawankule: महायुतीसह महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महायुतीत खटके उडणे सुरू असून, महाविकास आघाडीत तणाव असल्याचे सांगितले जात आहे. यातच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आता महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता अगदीच कमी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार असून, रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची माहिती दिली. रामटेक लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिंदे गटाचा उमेदवार तेथून निवडणूक लढणार आणि अमरावतीची जागा भाजपकडे राहणार. याबाबत चर्चा असून लवकरच निर्णय होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
बच्चू कडू आमच्यासोबत राहतील
अमरावती मतदारसंघात काही मतभेद होत असतात. बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील. मात्र देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी बच्चू कडू,अडसूळ सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू आमच्यासोबत राहतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. संभाजीनगरबाबत तिढा नाही. चर्चा सुरू आहे. संजय राऊत सारख्या लोकांना जनता धडा शिकवेल, जे विरोधी पक्षातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका करत आहेत त्यांना जनता मतपेटीतून उत्तर देतील, असा पलटवार बानकुळे यांनी केला.
दरम्यान, अमरावतीची जागा भाजपकडे आहे. शंभर टक्के ही जागा भाजपच्या चिन्हावर लढू आणि महायुतीचे सर्व नेते एकत्र येऊन ही जागा आम्ही जिंकणार आहे. उदयनराजे यांची साताराची मागणी आहे, त्यावर महायुतीचे नेते निर्णय घेतील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.