अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:51 PM2024-06-13T16:51:48+5:302024-06-13T16:53:56+5:30

BJP Chandrashekhar Bawankule: अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

bjp chandrashekhar bawankule reaction about rss statement on ajit pawar joins mahayuti | अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

अजितदादांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले? चंद्रशेखर बावनकुळेंचे सूचक विधान, म्हणाले...

BJP Chandrashekhar Bawankule: लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ने भाजपाला फटकारले आहे. तर, मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातूनही भाजप नेत्यांचे कान टोचण्यात आले. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, अजित पवार यांना महायुतीत घेऊन भाजपाचे नुकसान झाले का, या प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले.

ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपाच्या कामगिरीसह लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? अशी विचारणा या लेखातून करण्यात आली होती. पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरही प्रतिक्रिया विचारण्यात आली.

सुनेत्रा पवार यांना महायुतीचे समर्थन

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरताना महायुतीतील भाजपा, शिवसेना शिंदे गट यांचे नेते उपस्थित नव्हते. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुनेत्रा पवारांना दिलेली जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे. महायुतीमधून त्यांना सगळ्यांचे समर्थन आहे. महायुतीमधून हा नाही गेला, तो नाही गेला, याला काही अर्थ नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पाठिंबा दिला होता . इतर निवडणुकीबाबत आमची त्यांची चर्चा बाकी आहे. चर्चा झाल्यावर यातून मार्ग निघेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, अजित पवारांना घेऊन भाजपाचे कोणतही नुकसान नाही. उलट २०१९ च्या तुलनेत भाजपाची मते वाढली. मात्र जागा कमी झाल्या हे सत्य आहे. महाविकास आघाडीतील लोक पराभूत झाल्यानंतर ईव्हीएमला दोष देतात. मात्र जिंकलेल्या जागा असतील, तिथे ईव्हीएमवर संशय का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
 

Web Title: bjp chandrashekhar bawankule reaction about rss statement on ajit pawar joins mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.