Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेतेबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच आता बाळासाहेब थोरात आता भाजपमध्ये जाणार का, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
बाळासाहेब थोरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावर, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कुणालाही भाजपात यायचे असेल तर ते येऊ शकतात. आम्ही सर्वांचे स्वागतच करत आहोत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमचा राजकीय पक्ष आहे. पक्ष वाढविणे हे आमचे काम आहे. बाळासाहेब थोरात असो किंवा अन्य कुणीही असो. जर भाजपत प्रवेश करण्यास इच्छूक असेल तर त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही त्यांना प्रवेश देतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.
काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे
बाळासाहेब थोरात यांच्या रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी खूप मोठे काम केले आहे. प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला त्यांनी सावरले होते. त्यामुळे ते भाजपात प्रवेश करतील, असे मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात यांनी नऊ वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. बाळासाहेब थोरात यांच्यासारखे नेते पक्षात दुखावत असतील तर काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्याएवढ्या उंचीचा नेता जर माझ्यावर नाराज झाला असता तर मी नक्कीच त्यांचा विचार केला असता किंवा त्यांवर चिंतन केले असते. मला असे वाटते की, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी यावर विचार करायला हवा. तसेच सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये येण्याबद्दल कोणताही प्रस्ताव दिला नाही. त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"