Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray in Mahayuti: महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांनी जोर धरला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक बैठक केल्याचा दावा केला जात आहे. यातच भाजपा नेत्यांनी राज ठाकरेमहायुतीत सहभागी होणार असल्यास स्वागत करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट आणि महायुतीतील सहभागाच्या चर्चा यावर भाष्य केले. महायुतीतले सर्वच घटक पक्ष मिळून आम्ही प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मते मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्येक बुथवर काम करत आहोत. आमचे उमेदवार निवडून आणू. आम्हाला जिंकण्याचे राजकारण करावे लागेल. महायुतीत ज्यांना जी जागा मिळेल ती लढवून जिंकावी लागेल. आम्ही जागा आणि चिन्हांचा विचार करत नाही. आम्ही केवळ प्रत्येक जागा महायुती कशी जिंकेल यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
PM मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरेंनी काही विचार केला असेल तर स्वागत करू
राज्याला, देशाला समृद्ध करण्यासाठी विकास झाला पाहिजे. यावर राज ठाकरे यांनी नेहमीच भाष्य केले आहे. मतांच्या तुष्टीकरणाचे राजकारण व्हायचे तिथे राज ठाकरे हे त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रखर विचार मांडायचे. त्यांचा पक्ष हा भाजपा आणि शिवसेनेच्या विचारांप्रमाणे चालणारा पक्ष आहे. देशाच्या, राष्ट्राच्या कल्याणाकरता, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदींच्या गॅरंटीवर देश पुढे नेण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विचार केला असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाईट वागणुकीमुळे शिवसेना सोडून गेले. खरेतर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसेनेबाहेर ढकलले. परंतु, आता देशाच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या विकासासाठी राज ठाकरे आमच्याबरोबर येतील. पंतप्रधान मोदींचा विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज ठाकरे हातभार लावतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.