Maharashtra Political Crisis: उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार यांच्यासोबत ३२ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या संबोधनात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ९० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असून, काही झाले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७१ च्या वर न्यायचीच आहे, असा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार हे सर्वांसाठी आदरणीय आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल सर्व आलेख मांडला. वेळोवेळी वेगवेगळी भूमिका घेतल्यामुळे पक्ष अडचणीत आला. विश्वासहर्ता कमी झाली. परिवारातही खोटे बोलावे लागले. कुटुंबही राजकारणापासून सुटले नाही. अजितदादांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्र, देश हिताची आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
जागांबद्दल काय बोलणे झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही
छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांनी त्यांना का पक्ष सोडावा लागला? ते का बाहेर पडले? हे सगळे मांडले. अजितदादांनी सत्य परिस्थिती मांडली. मी पवार कुटुंबाचा भाग आहे, खोटे बोलत नाही, असे अजितदादा म्हणाले. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे सांगताना जागांबद्दल काय बोलण झाले? काय नाही? हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. परंतु निवडणूका लागत नाही, तोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होत नाही. आम्ही म्हटले इतक्या जागा लढू, एकनाथ शिंदे म्हणाले, इतक्या जागांवर लढू पण खरे चित्र हे निवडणुका लागल्यानंतरच स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादी ९० जागा लढवणार हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे नाही, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची बैठक आधीच ठरली होती. त्यामुळे ते नागपूरवरुन गेले. त्यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसमोर अनेक विषय असतात. आमच्यात कुठलीही धुसफूस नाही. तीन भाऊ असल्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण मनभेद, मतभेद आमच्यात नाहीत. हे मजबूत सरकार आहे. बहुमताच सरकार असून ते टिकेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.