Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या गौप्यस्फोटानंतर अद्यापही यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिक भाष्य केले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात शरद पवारांनी एक विधान केले आहे. यातच, शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, परंतु देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको होते, असा मोठा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सरकार बनवण्याचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट होती ती उठली. ती उठल्यानंतर काय घडले ते तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. राज्यात तेव्हा तसे काही घडले नसते तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले असते का? असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर भाष्य केले.
शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती
शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती, पण त्यांना फडणवीस मुख्यमंत्री नको होते. पवारांना माहिती होतं की फडणवीस मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस, राष्ट्रवादी भुईसपाट होईल. फडणवीस मुख्यमंत्री नको असल्याची भूमिका पवारांनी कायमचं मांडली आहे. कारण पवार हे फडणवीसद्वेषी आहेत.पवारांना राज्यात कोणीही मुख्यमंत्री चालेल पण फडणवीस नको, असाच त्यांचा अजेंडा आहे. फडणवीस यांना विरोध करायचा तसेच त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवार काही करू शकतात. मी आधीच सांगितले होते की, फडणवीस हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य आणि केंद्र हे डबल इंजिन सरकार आहे. मुक्ता टिळक यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार काम करेल, यावर लोकांचा विश्वास आहे. कसब्यात भाजप आणि महायुतीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील. आमचे सगळे कार्यकर्ते मॅन टू मॅन प्रचार करत आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"