“हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 10:35 IST2025-03-17T10:32:20+5:302025-03-17T10:35:26+5:30
BJP Replied Congress Harshwardhan Sapkal: या अशा बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवून देईल, असा पलटवार भाजपाने केला आहे.

“हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार”; फडणवीसांवरील टीकेला भाजपाचे उत्तर
BJP Replied Congress Harshwardhan Sapkal: औरंगजेबाने धर्माच्या नावावर हिंदूंचे शिरकाण केले, मंदिरे पाडली, कर लादले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वांना घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून राज्य चालवत आहेत. त्यांच्या काळात हिंदू धर्माला अभिमानाने उभे राहण्याची संधी मिळाली. औरंगजेबाची तुलना देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी करून काँग्रेस महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करत आहे. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसने खालची पातळी गाठली आहे. याच बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. आणि असे हास्यास्पद वक्तव्य करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसला जागा दाखवून देईल, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट औरंगजेबाशी तुलना करणारे विधान केले. औरंगजेब क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
हर्षवर्धन सपकाळ यांचे विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्याने हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे, या शब्दांत बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दरम्यान, आम्ही जो काही कारभार केला, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केला आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.