Chandrashekhar Bawankule Vs Vijay Wadettiwar: चंद्रयान ३ मोहिमेच्या अभूतपूर्व यशामुळे इस्रो शास्त्रज्ञांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्याहून थेट बंगळुरूला गेले. बंगरुळूत मोदींचा रोड शो ही करण्यात आला. त्यावरुन, आता विरोधकांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी शास्त्रज्ञांना जरुर भेटावे, पण रोड शो कशासाठी केला? असा सवाल राज्यातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. शास्त्रज्ञांचे कौतुक करायला आणि भेट घ्यायला त्यांनी गेलेच पाहिजे. मात्र, जाताना बंगळुरुत रोड शो करण्याची काय गरज, रोड शो कशासाठी?. मग, त्यांच्या रोड शोमध्ये शास्त्रज्ञ का नाहीत, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विचारला. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. मात्र, चंद्रयान मोहिमेच्या यशावरुन मोदींकडून राजकारण करण्यात येत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले.
स्वतः सक्रीय असल्याचे राहुल गांधींना दाखवावे लागते
विजय वडेट्टीवार नवीन नवीन विरोधीपक्ष नेते झाले आहे. मी सर्वात सक्रीय नेता, मोठा नेता असल्याचे राहुल गांधींना दाखवावे लागते. त्यामुळे ते जनतेला पटत नाही असे बोलतात. वडेट्टीवार ईडी, सीबीआयवर असा अविश्वास दाखवणार असेल तर देशात काहीच राहणार नाही, असे प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच काँग्रेस ढासाळलेल्या अवस्थेत आहे. भाजपला जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भीतीपोटी ते असे विधान करत आहेत. भाजप पक्षाचा इतिहास गौरवशाली आहे, आम्हाला जन्मजात काही मिळाले नाही. काँग्रेस बरखास्त करा असे महात्मा गांधी म्हणाले होते, याची आठवण चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी करून दिली.
दरम्यान, भारत चंद्रावर पोहचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ दिल्याने मोहीम यशस्वी झाली, त्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणे ही नैतिकता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत गेले. पण विरोधकांना ते सहन होत नाही, कारण ६५ वर्षांत त्यांनी कधीच अस काही केले नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.