Maharashtra Politics: आताच्या घडीला आगामी २०२४ लोकसभा निवडणुकांसह राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर रणनीति आखायला सुरुवात केली आहे. यातच भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध ठिकाणी दौरे करण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांचे भाजपमध्ये स्वागत आहे, असे सांगत थेट खुली ऑफर दिली आहे.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर करण्यात आलेल्या टीकेवरुन बावनकुळे यांनी राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख ‘टोळी’ असा केला आहे. शरद पवार सोडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही व्हिजन नाही, असेही बावनकुळेंनी म्हटले आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी अनेक वर्ष काम केलेले आहे. पण पक्ष म्हणून जर विचार केला तर या पक्षाला कुठलेही व्हिजन नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीकडे काही व्हिजन आहे का?
राष्ट्रवादीकडे काही व्हिजन आहे का? हा व्हिजन असणार पक्ष आहे का? अशी विचारणा करत, राष्ट्रवादीने म्हणजे नेत्यांनी तयार केलेली एक टोळी असून त्या टोळीतून निर्माण झालेला हा पक्ष आहे. ज्या ठिकाणी नेता आहे त्या ठिकाणी टोळी आहे. नेता गेला की राष्ट्रवादी गेली. त्यामुळेच या पक्षाला काही व्हिजन नाही, या शब्दांत बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेच खरपूस शब्दांत समाचार घेतला.
दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये अनेक विषयांवरुन धुसपूस सुरु आहे. ती अनेकदा सार्वजनिक पद्धतीने बाहेर सुद्धा आली आहे. पण ही धुसपूस कशी थांबवायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजपमध्ये जो येत असेल त्याच्यासाठी आमचे कमळ तयार आहे. आम्हाला हे करा, ते करा अशी कोणतीही अट आम्ही घालणार नाही. भाजपमध्ये आमच्या संघटनेच्या शिस्तीप्रमाणे काम करणाऱ्यासाठी जो कोणी येत असेल त्याला आम्ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश द्यायला तयार आहोत. आम्ही त्याचे स्वागत करु. त्यांचा मानसन्मान करु. त्यांना ज्या पक्षात होते. त्या पक्षापेक्षाही चांगली वागणू देऊ, असे बावनकुळे म्हणाले.