Shiv Sena Shinde Group Vs BJP News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. जागावाटपावरील चर्चांना अंतिम स्वरुप देण्यात येत असले तर महाविकास आघाडीसह महायुतीतील घटक पक्ष काही जागांवर ठाम असल्याचे चित्र आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.
सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचे आहे. परंतु, असे होणार नाही. आपण दोघे भाऊ-भाऊ, तुझे आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू… असे चालणार नाही. महायुतीत असे होता कामा नये. कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले होते. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील
रामदास कदम यांच्या भूमिकेबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, रामदास कदम जे बोलले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. रामदास कदम यांनी केलेले विधान हे काही महायुतीचे मत नाही. त्यांचे मत हे वैयक्तिक स्वरुपाचे आहे. वारंवार सांगतो की, भाजपा सहकारी पक्षांना चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आमच्याकडे घटकपक्षांना खूप मान आहे. काँग्रेस पक्षाने घटकपक्षांना संपवले. आम्ही मात्र घटकपक्षांना प्रचंड ताकद दिली, मान सन्मान दिला, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीत बेबनाव असल्याचा दावा करत टीका केली आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढणार आहे. रामदास कदम यांनी केलेले विधान हे ट्रेलर आहे. खरा पिक्चर तर बाकी आहे, या शब्दांत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला.