Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसा ठाकरे गटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, यातच आता महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
राहुल गांधी लवकरच उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भेटणार असल्याचे म्हटले जात आहे. तसे झाल्यास मातोश्रीवर येणारे गांधी कुटुंबातील राहुल गांधी हे पहिलेच नेते ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या भेटीदरम्यान सावरकर वाद आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
वीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी
मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. आताही त्यांची भूमिका बदलली नाही. त्यांनी माफी मागीतली नाही. महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी, मगच महाराष्ट्रात पाय ठेवावा. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची जर भेट होत असेल तर ही एक चांगली गोष्ट आहे. दोन्ही नेते अतिशय सालस आहेत. दोन्ही नेत्याचा एकच उद्देश संविधान वाचावे असा आहे. ते वाचवण्यासाठी जे करावे लागले ते करायलाही हे नेते तयार आहेत. मी या गोष्टीला सर्व पॉझिटिव्ह घेते. दोन्ही समजदार आणि सालस नेतृत्व आहे.जे काही ते निर्णय घेतील ते या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी फायदेशीर असेल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"