Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, खोट बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही. तसेच जे घडले असेल तेच त्यांनी सांगितले असणार. ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी विधान केले आहे त्यावर बोलायचे झाल्यास देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास आणि त्यांचा इतिहास बघितल्यावर देवेंद्र फडणवीस हे खरे बोलत आहेत, असे वाटते, असे म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो, देवेंद्र फडणवीस राजकारणाकरिता स्वतःची खुर्ची वाचविण्याकरिता किंवा खुर्ची मिळविण्याकरिता कधीच असत्य कथन करीत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे परिणामी अनेक वेळा नुकसान झाले आहे. गंगाधर फडणवीस यांचे त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यामुळे ते कधीही असत्य विधान करू शकत नाही. ते त्यांच्या रक्तात नाही, असे बावनकुळे यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांचे खरच नुकसान झाले
मीडियाशी बोलताना, उपमुख्यमंत्रीपद मिळाल्याने फडणवीस यांचे नुकसान झाले का? असा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावर, देवेंद्र फडणवीस यांचे खरच नुकसान झाले आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चेहर्यावर उद्धव ठाकरे यांनी आमदार निवडून आणले. त्यावेळी झालेल्या सभेत उद्धव ठाकरे अनेक वेळा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असणार आहेत. त्यादरम्यान झालेल्या निवडणुकीचे निकाल येताच तिकडे दरवाजे बंद करण्यात आले, अशी टीका बावनकुळे यांनी केली.
दरम्यान, २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्याकाळात विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत कधीही सूड भावनेने त्यांनी काम केले नसून, उलट देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला आहे, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"