Maharashtra Politics: विधान परिषदेच्या निवडणुकांकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे बाजी मारणार की, महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील गुलाल उधळणार, याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागून राहिली आहे. यातच सत्यजित तांबे यांना भाजपने अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजित तांबे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबाचा निर्णय घ्यावा. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही, हे निश्चित, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते. यानंतर आता सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली. त्यामुळे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु
मीडियाशी बोलताना, सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही सत्यजित तांबे यांना भाजपात येण्याबाबत आवाहन केले होते. सत्यजित तरुण आहे. त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे. तो नक्की निवडून येईल. आता त्याने भाजपमध्ये यावे. यासाठी आम्ही अग्रही आहोत, असे विखे-पाटील म्हणाले होते.
दरम्यान, काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्याऐवजी त्यांचा मुलगा डॉ. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरील राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर पाठिंब्याबाबत भाजपकडून जाहीररित्या काहीच सांगण्यात आले नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"