अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २२ जानेवारी रोजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले. मात्र या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे. यावरून पक्षात गोंधळ उडाला असून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंबरिश डेर, आमदार अर्जुन मोधवाडिया, यूपी काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णा यांसारख्या नेत्यांनी पक्षाच्या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे.
प्रभू राम हे देशातील जनतेच्या श्रद्धेचा विषय असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं" असा टोला देखील लगावला आहे.
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राम मंदिरावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटरून याबाबत ट्विट केलं आहे. "जो न हित के राम का वह न किसी के काम का! काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते."
"राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते.. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे. यापूर्वी काँग्रेसनं अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसनं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे जो न हित के राम का वह न किसी के काम का! हे काँग्रेसनं लक्षात ठेवावं. जय श्रीराम!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.