उद्धव ठाकरे यांनी "पावसाच्या अनियमिततेमुळे दुबार पेरणी करावी लागत आहे. त्यातच बोगस बियाणे आणि खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी संकटात अडकला आहे. या संकटात मदतीचा हात देण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी हे पक्ष पळविण्यातच व्यग्र आहेत" अशी टीका केली. तसेच भाजपसोबतच्या युतीत २०१९ मध्ये अडीच वर्षांचा मुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला होता. तो त्यांनी पाळला नाही. यामुळे आता भाजपातील निष्ठावंतांवरच सतरंज्या उचलायची वेळ आली आहे" असाही घणाघात ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. यासोबतच "शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले" असंही म्हटलं.
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) य़ांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाह भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदीजी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही."
"खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात"
"युती करताना तुम्ही देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपसोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात."
"शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं, तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला"
"शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे य़ांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.