उद्धव ठाकरे यांनी शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर निशाणा साधला. "कोरोना काळात हीच आरोग्य यंत्रणा होती, परंतु सरकार बदलल्यानंतर आरोग्य यंत्रणेची दुर्दशा झालीय. याच आरोग्य यंत्रणेने जीवाची बाजी लावून कोरोना काळात काम केले, औषधे दुर्गम भागात पोहचवण्याचे कामही याच यंत्रणेने केले होते पण योद्धासारखे लढणाऱ्यांना आज बदनाम केलं जातेय" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी घणाघात केला. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?, तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही?" असे खोचक सवाल विचारले आहेत. तसेच "उद्धवजी, तुम्ही मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनीआपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी जनाची नाही मनाची असेल तर कोविडमध्ये तुम्ही केलेली लूट आठवा, ऑक्सिजनविना महाराष्ट्रात तडफडणारे रुग्ण आठवा आणि राज्यात हे सुरू असताना तुम्ही मात्र टेंडर वाटण्यात मश्गूल होतात. उद्धवजी, तुम्ही तर मृतदेहासाठी वापरायच्या बॅगध्येही कट कमिशन सोडलं नव्हतं. मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्लं, तुम्हाला आरोग्य व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार आहे का?"
"मुख्यमंत्री नागपुरात का गेले नाहीत? नांदेडला का गेले नाहीत? मुख्यमंत्री घरात का बसले? असं कोण विचारतंय तर ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुकवर सरकार चालवलं ते उद्धव ठाकरे! उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही नांदेडला जाणार का? तर त्यावर ते म्हणतात मी कशाला जाऊ? माझा पक्ष चोरलाय, माझं पद गेलं. म्हणजे पदावर असताना घरी बसायचं. पद गेल्यावरही घरात बसून पत्रकार परिषद घ्यायची आणि स्वतः काही करायचं नाही हे म्हणजे उद्धवा अजब तुझा कारभार! तुमचे सरकार असताना कोविड काळात जे घोटाळे झाले त्याबद्दल कधी तरी बोलणार की नाही?" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.