उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय त्यांनी नुकताच जाहीर केला होता. त्याच्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरूवात करण्याचे ठरवले. आज यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. भाजपा हा पक्ष आता काहीही बोलायच्या लायकीचा राहिलेला नाही, असा सडेतोड पलटवारही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले" असं म्हणत टीकास्त्र केला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) य़ांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच "तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही" अशा शब्दांत निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"उद्धव ठाकरे जी तीन वर्षांपूर्वी तुम्ही महाविकास आघाडी घरात घुसवून घेतली होती. याचा तुम्हाला विसर पडला काय? ज्यांना आज तुम्ही बाजारबुणगे म्हणत आहात कधीकाळी त्यांच्याच जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे लोक शिवसेना सोडून बाहेर पडले हे विसरू नका. तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून राज्य चालवता आलं नाही आणि पक्षप्रमुख म्हणून पक्षही सांभाळता आला नाही."
"तुम्हाला मिळत असलेला "प्रचंड प्रतिसाद" पाहून तुमचे उरलेले साथीदारही तुमची साथ सोडत आहेत आणि येत्या काळातही लोक तुम्हाला सोडून जाणार आहेत. त्यामुळे भाजपवर टीका करण्याआधी बुडाखाली असलेला अंधार बघा" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी "भाजपा आता काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. भाजपाने आता कोणावरही दोषारोप करण्याचे सोडून द्यावं. आता त्यांनी त्यांच्या घरात घुसलेल्या बाजार बुंडग्यांचा सांभाळ करावा. दुसऱ्यांवर टीका करत बसू नये" असं म्हटलं आहे.