उद्धव ठाकरे यांची शनिवारी महाड य़ेथे सभा झाली. शिंदे गट, भाजपा आणि मोदी सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. "प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपाला तडीपार करा" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला. तसेच "निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवी. पण हे मन की बात करतात. २०१४ साली दिलेले आश्वासन काय होती? त्यावर कोणी विचारले की तुरूंगात टाकायचे" असं म्हणत टीका केली. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"तुम्ही अडीच वर्षे घरात बसून कारभार केला, भान ठेवून बोला"; असं म्हणत घणाघात केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "गेल्या अडीच वर्षांत तुम्हाला सहकारी आमदारांची 'मन की बात' ऐकता आली नाही. नाकाखालून 40 आमदार निघून गेले. हे देखील तुम्हाला कळले नाही" असं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात‘वर टीका करायची आपली पात्रता तरी आहे का?"
"तुम्हाला गेल्या अडीच वर्षांत तुमच्या सहकारी आमदारांची 'मन की बात' ऐकता आली नाही. तुमच्या नाकाखालून चाळीस आमदार निघून गेले. हे देखील तुम्हाला कळले नाही. अडीच वर्षे तुम्हाला जनतेच्या हिताचं एकही काम करता आलं नाही. तुमच्या सरकारची कारकीर्द १०० कोटी वसूल करण्यात गेली. आणि तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल गप्पा मारत आहात. जरा भान ठेवून बोला. भ्रष्ट कारभार कुणाचा आहे हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. आदरणीय मोदीजींनी गेल्या ९ वर्षांत प्रत्येक दिवस जनतेच्या कामासाठी दिला आहे आणि त्यांची मन की बात ऐकली. तुम्ही अडीच वर्षे घरात बसून कारभार केला. त्यामुळे जनतेच्या मनातील बात तुम्हाला कधीच कळणार नाही" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी " भाजपाची भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. भाजपा आता भ्रष्ट जनता पार्टी झाली आहे. मेघालयात अमित शाह यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. पण साध्या माणसांवर धाडी टाकताय. कुठे आहे हिंदुत्व ? कुटुंब उदध्वस्त करायचे. मोदी व्यक्ती विरोधात नाही, वृत्ती विरोधात मी आहे. निवडणुका येतील जातील. पण २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल. तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही मोदींचे नाव घेवून या, मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो" असं म्हटलं आहे.