माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्रजी तुमची परिस्थीती खूप हालाखीची आहे, तुम्ही बोलताय ते ठिक आहे. तुमचे अपमान होत आहेत. ते तुम्हाला सहन होत नाही आणि सांगताही येत नाही कारण वरुन आदेश आहे, असा टोला लगावला. सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध आम्ही करतोच. पण ज्या सावरकरांनी स्वातत्र करण्यासाठी कष्ट केले. कष्ट करुन देश स्वतंत्र केला. तो देश आता ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात कोणताही काडीचा संबंध नव्हता ती लोक आता देश आपल्या जोखडाखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे, जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुम्ही तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा, हिंमत असेलतर करुन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिले.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धवजी तुम्ही संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) य़ांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे, "उद्धवजी, तुम्ही हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना तिलांजली देऊन त्यांनी स्थापन केलेली शिवसेना स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी उध्वस्त केली. तुमच्या नाकर्तेपणामुळे आजही लोक तुमचा पक्ष सोडून जात आहेत. आणि आता तुम्ही मा. नरेंद्र मोदीजी आणि मा. अमित शाह यांच्या नावाने खडे फोडत आहात. मोदीजी आणि अमितभाईंवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? हे तपासून बघा. आमची बावनकुळं ही विचारांचे पाईक राहिलेले कुळं आहेत. तुमच्यासारखं खुर्चीसाठी हिंदुत्व सोडणारं हे कुळ नाही. याचा मला सार्थ अभिमान आहे."
"सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही देवेंद्र फडणवीस’जींची नाही तर तुमची अवस्था आहे. हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेबांनी उभा केलेला पक्ष उद्धवजी तुम्ही संपवून टाकला. वडिलांनी कमावलं आणि मुलानं खुर्चीसाठी गमावलं हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी देणाऱ्या मोदीजी आणि अमितभाईंवर टीका करु नये. आणि तुमच्या सरकारच्या काळातील १०० खोक्यांची वसुली अद्याप जनता विसरलेली नाही, हे ध्यानात घ्या" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.