उद्धव ठाकरे यांनी "प्रचारात धर्म, देवाच्या नावावर मते मागितली जात आहेत ते योग्य आहे की अयोग्य याबाबत निवडणूक आयोगानं खुलासा करावा" अशी मागणी केली आहे. तसेच "कर्नाटकात पंतप्रधान मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदान करण्यास सांगितले होते. अमित शाह यांनी अलीकडेच मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू. धर्म आणि देवाच्या नावावर मतदान मागणे हे आचारसंहितेत बसत की नाही? जर बसत असेल तर आम्ही देखील पुढच्या निवडणुकीत जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून मतं मागू" असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर भाजपाने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात" असं म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"काँग्रेसप्रमाणे आता उद्धव ठाकरेंना देखील रामनामाची ॲलर्जी झाली आहे. रामनामाचा आणि रामभक्तांचा भाजपला अभिमान आहे. तुम्हाला मात्र आता रामनामाचा गजर केला की त्रास होतोय. काँग्रेसनं प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले होते आता तुम्ही रामनाम आणि रामभक्तांचा तिरस्कार करत आहात. तुम्ही कितीही विरोध केला तरी करोडो रामभक्त आयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेतील. जय श्रीराम!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी "गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून 6 वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. भाजपाचा कारभार रामभरोसे चालला आहे. मी राजकारण आणू इच्छित नाही. जो प्रचार सुरू आहे तो चुकीचा आहे की बरोबर हे निवडणूक आयोगाने कळवावे" असं म्हटलं होतं. त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.