उद्धव ठाकरे यांनी "देश कोणत्याही एका व्यक्तीचा असू शकत नाही, आम्हाला विकास हवा आहे मात्र देशाला गुलाम करणारा विकास आम्हाला नको, २०२४ ला जर बदल केला नाही तर देश नालायक लोकांच्या हातात जाईल" अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या हिंदुत्वावरही सडकून टीका केली आहे. जे एकमेकांमध्ये भेद करतात त्याला हिंदुत्व म्हणत नाही ,काही लोक हेच काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. यावरून आता भाजपानेउद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
"उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
"मोदीजींमुळे देशाची मान उंचावली"
"बऱ्याच दिवसानंतर उबाठाचे नेते उद्धव ठाकरे काल घराबाहेर पडले आणि मजल दर मजल करत त्यांनी ठाणे गाठले. आणि कधी नव्हे ते त्यांना उत्तर भारतीय मतदारांची आठवण झाली. आणि पुन्हा एकदा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका केली. देशासाठी मोदीजी काय करतात याचे प्रमाणपत्र उद्धव ठाकरे यांनी देण्याची गरज नाही. मोदीजींमुळे देशाची मान उंचावली आहे. पण उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली आहे."
"आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही"
"मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात. माझे कुटुंब माझी जबाबदारी हे फक्त तुमच्या भाषणात आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र आदित्य ठाकरेंना मंत्री करताना तुम्हाला सच्चा शिवसैनिक दिसला नाही. त्या प्रामाणिक शिवसैनिकाला दूर ठेवले म्हणूनच कधीकाळी हजारोंच्या उपस्थितीत सभा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला. तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.