उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. एका सभेत बोलताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने शब्द दिला होता. पण आता खोटे बोलत आहेत, असा दावा ठाकरेंनी केला. तुळजा भवानी देवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शाह खोटे बोलत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरे, तुम्ही खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतत ट्विट केलं आहे. "पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे सुरू झाले" असं म्हणत घणाघात केला आहे.
"शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते."
"महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता. तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!! निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई घेत होते, तेव्हाच हा खुलासा का केला नाही? कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो. आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता?"
"आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणले.. हाती धुपाटणे आले म्हणून पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे सुरू झाले. तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका. जय महाराष्ट्र" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.