संजय वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकाही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी न देता, प्रखर हिंदुत्ववादी पार्टी अशी ओळख निर्माण करून एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पार्टीने, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत मात्र, आपला रंग बदलला आहे. मालेगावच्या पूर्व भागात तब्बल २८ मुस्लीम उमेदवारांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.मालेगावमध्ये स्वीकारलेल्या या भूमिकेचा पक्षाला कितपत फायदा होईल, याबाबत तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.२४ मे रोजी महानगरपालिकेच्या २१ प्रभागांतील ८३ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे. (प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेसच्या किशोरीबानो अशरफ कुरैशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.) मालेगावमधील यापूर्वीच्या निवडणुका मोसम नदीची सुधारणा, भुयारी गटार, यंत्रमाग उद्योगाचे स्थलांतर आदी मुद्द्यांवर केंद्रित होत्या. दर्शनी विकास मालेगाव पालिकेकडून साकारला गेलेला नसला, तरी सर्वशिक्षा अभियानांतर्गत बाक खरेदी, अपंग शस्त्रक्रिया घोटाळा, संगणक खरेदी, पुस्तक खरेदी, कचरा ठेका असे गैरप्रकार करणाऱ्या महापालिकेची ‘घोटाळ््यांचे माहेरघर’ अशी नवी ओळख निर्माण झालेली आहे.पूर्व भागात कॉँग्रेससमोर राष्ट्रवादी आणि जनता दलाने आघाडी करून आव्हान उभे केले आहे़ पश्चिम भागात सेना आणि भाजपाने परस्परांविरुद्ध दंड थोपटले आहेत. दखनी आणि मोमीन या वादात न पडता, भाजपाने आपल्या भूमिकेत केलेल्या बदलाचा त्यांना कितपत फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. जनता दलाचे दिवंगत नेते निहाल अहमद यांनी मालेगावचे प्रथम महापौर होण्याचा मान मिळविला होता. त्यांच्यानंतर मात्र, जनता दलाचा प्रभाव दिसत नाही. या निवडणुकीत तर पक्षाला उमेदवारही मिळालेले नाहीत. त्याउलट एमआयएमने मालेगावात आपले पाय रोवले असून, तब्बल ३७ उमेदवार उभे केले आहेत.
मालेगावात भाजपाने रंग बदलला!
By admin | Published: May 22, 2017 3:40 AM