मुंबई - शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या निमित्त उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे २ गट पडले असल्याने कुणाचा मेळावा यशस्वी होणार, कुणाकडे किती गर्दी जमणार याचीही उत्सुकता लागली आहे. या राजकीय परिस्थितीत भाजपानं उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आज उद्धव ठाकरे शिल्लकसेनेच्या मेळाव्यात तुम्ही गटप्रमुखांच्या बैठकीतील भाषण पुन्हा करणार असे ऐकले. त्यात थोडी भर घालणार असाल, तर काही मुद्दे सुचवू का? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना तुम्ही घरात बसून केलेल्या भाषणात लाकुडतोड्याची गोष्ट सांगितली होती. आज कोणती नवी गोष्ट सांगणार? लाकुडतोड्याच्या गोष्टीतला कुऱ्हाडीचा दांडा नेमका कोण हे सांगणार आहात का? कारण तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या अट्टाहासामुळे जनकौल मिळालेली युती तुटली, शिवसेना फुटली, असे बहुसंख्य शिवसैनिकांचे म्हणणे आहे. अट्टाहासामुळे शिवसेना फुटली, याची कबुली देणार का? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच तुम्ही सत्तेवर असताना एकही नवा विकास प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. वेदांता फॉक्सकॉनला ‘वाटाघाटी’च्या हट्टापायी घालवलेत. फडणवीस सरकारच्या काळातील अनेक प्रकल्प स्थगिती देऊन बंद पाडलेत. यामुळे महाराष्ट्राचे हजारो कोटींचे नुकसान कोण भरून देणार याचे उत्तर आज देणार का? तुमच्या सत्ताकाळात वसुलीबाज वाजेसारख्यांच्या कारवायांमुळे हजारो नागरिकांचे खिसे कापून पैसा लुबाडला गेला. हे खोके कोणाकडे गेले याचे गुपित आज उघड करणार का? अडीच वर्षांत तुम्ही महाराष्ट्रासाठी केलेली किमान दहा कामे दाखवू शकाल का? ज्यामुळे तुमच्या सत्तेचा जनतेला थेट फायदा झाला? असा प्रश्नांचा भडीमार भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला आहे. त्याला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणे गरजेचे आहे.
ज्याला भाजपाची चीड तो मेळाव्याला येईलखोके दिल्यावर शिंदे गटाला हिंदुत्वाचा साक्षात्कार झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात येतील की नाही माहिती नाही. परंतु महाराष्ट्रातल्या पुरोगामी संघटना, चळवळी ज्याला उद्धव ठाकरेंचे संयमी नेतृत्व आवडलंय. ज्याला भाजपाचा राग, शिंदे गटाची चीड आहे तो मेळाव्याला येईल. संविधानाची चौकट अबाधित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे सक्षम नेतृत्व आहे. केवळ शिवसैनिक नाही तर ज्याला उद्धव ठाकरेंचे विचार पटले आहेत तो मेळाव्याला उपस्थित राहील असा विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"