मुंबई - राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांच्यावर टीका करताना 'लाचखोर नवऱ्याची बायको', असा चित्रा उल्लेख केला होता. मेहबूब शेख यांच्या टीकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वाघ आहे वाघ…, कशी आहे ते तुमच्या बापाला जाऊन विचारा', अशा शब्दात त्यांनी पलटवार केला. यानंतर आता पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. "विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातंय" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना…अन्यायाविरोधात पेटून उठा" असंही म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जातीये तरीही.... मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही. विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातंय. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं…या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे आवाज उठवतीये व उठवत राहणारचं…!! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी नगरमध्ये भाषणादरम्यान चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली होती. 'चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली होती. शेख यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उत्तर दिलं. 'सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले, आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे. वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही. मी काय आहे अन काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या,' अशा शब्दात चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
"महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज"; भाजपाचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्रात सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडाराज असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली. राज्यात अशा प्रकारे गुंडाराज पसरत असल्याने महिला दहशतीखाली जगत असल्याची गंभीर टीका देखील त्यांनी केली. ठाणे महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षक यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी विचारपूस केली. पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा निषेध करीत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरत महाराष्ट्रात सरकार नावाची चीज आहे का? असा सवाल केला. महाराष्ट्रात व्यावसायिक, प्रशासकीय महिला अधिकारी देखील सुरक्षित नाहीत त्यामुळे इथे गुंडाराज असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनेची संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, परंतु सध्याचे सरकार काय करत आहे, असा सवालही त्यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात फेरीवाले धोरण पुढे आणले गेले. परंतु आता ते धोरण राबविले जात नसल्यानेच फेरीवाल्यांची संख्या आणि त्यांची मुजोरी वाढत असल्याची टिकाही त्यांनी केली.