गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्यावर दबाव आणून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकणार होते असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. अशातच आता मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक असे आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, असे सचिन वाझेने म्हटलं आहे. यावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
"सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला" असं म्हणत भाजपाने उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे. तसेच "सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पाहतोय" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला! सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी."
"निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पाहतोय" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.