मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबरीपतनावेळी त्याठिकाणी होते असा दावा करीत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे तेव्हा जबाबदारी का स्वीकारली नाही, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले की, फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, पण आजवर बाबरीपतनात ते सहभागी असल्याचे कधीच सांगितले नाही. इतकी वर्षे त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून का लपविली, असा प्रश्न मला पडला आहे. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांना सणसणीत टोला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी "बाबरी पाडली तेव्हा आपण त्या ठिकाणी होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. 1992 साली फडणवीस अवघ्या 13 वर्षांचे होते. त्यावेली फडणवीस अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी 13 वर्षांच्या बालकाला अयोध्येला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले" असं म्हटलं होतं त्यावर आता "जयंत पाटलांचे हे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल" असं म्हणत चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
"बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त 13 वर्षांचे, अडवाणींनी लहान मुलाचे प्राण धोक्यात घातले' इति जयंत पाटील. 1970 साली जन्मलेले देवेंद्रजी 1992 साली 13 वर्षांचे होते हे जयंत पाटलांचे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल… हेची फळ काय मम तपाला।" असं चित्रा वाघ यांनी आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरेंनी लगेच बाबरीपतनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी फडणवीस यांनी जबाबदारी का स्वीकारली नाही? कारसेवकांबरोबर सहभागाचा तो किस्सा सविस्तर सांगण्याची विनंती मी फडणवीस यांना भेटीवेळी करेन. त्यांनी सर्व घटनाक्रम मला व्यवस्थित सांगावा, अशी इच्छा आहे असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
धार्मिक राजकारणावर जयंत पाटील म्हणाले की, मार्क्सने म्हटल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. हीच गोळी सर्वसामान्य जनतेला देऊन त्यांना महागाईच्या प्रश्नापासून अलिप्त ठेवायचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी मोदी सरकार काही बुजगावण्यांना पुढे करीत आहे. सरकार चालविण्यामधील अपयश लपविण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सामान्य माणूस अशा गोष्टींना बळी पडणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते. महाराष्ट्रात भोंग्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा मनसेने दिला असला तरी राज्यभर असे आंदोलन करण्याची ताकद मनसेकडे नाही. मनसेला जर अन्य पक्षाची ताकद मिळाली तर ते शक्य आहे. त्यामुळे पोलिस योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील, असे जयंत पाटील म्हणाले.