मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अजून एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध आहेत. तसेच क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीमध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया त्याच्या गर्लफ्रेंडसह उपस्थित होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. खेळ संपला पण खेळाडू अद्याप मोकाट आहे, असे विधानही मलिक यांनी यावेळी केले. यानंतर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी नवाब मलिक यांच्यावर जोरदार निशाणा साधत समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे.
चित्रा वाघ यांनी "... तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला... तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "तुम्ही…त्याला धमक्या दिल्या, त्याला अपमानीत केलं, त्याच्या पत्नीला शिव्या दिल्या, त्याच्या बहिणीवर आरोप केले, त्याच्या आई-वडीलाना बदनाम केलं, त्याचा जात धर्म काढला… तरीही तो डगमगला नाही, कर्तव्य बजावत राहीला… तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला" असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच I Support Sameer Wakhende असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
"जनाब संजय राऊत, तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय"
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "सर्वज्ञानी जनाब संजय राऊत, तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय" असं देखील म्हटलं आहे. "सर्वज्ञानी जनाब संजय जी राऊत तुम्हाला समीर वानखेडे हा अधिकारी बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी नसून मुसलमान आहे हे सिद्ध करणाऱ्यांची पाठराखण करण्याची का एवढी घाई लागलेली आहे ?? न्यायालयीन प्रकरणावर अशा गलीच्छ पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नांचा मी धिक्कार करते. जय हिंद..." असं वाघ यांनी म्हटलं आहे.
"जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं"
चित्रा वाघ यांनी क्रांती रेडकर सोबत असल्याचं जाहीर केलं आहे. आर्यन खानच्या पाठीशी बॉलिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच मी महिला म्हणून अभिनेत्री क्रांती रेडकरसोबत आहे असंही त्यांनी जाहीर केलं. "काय जमाना आहे, आर्यन खानच्या पाठीशी बॅालिवूडसह सरकार उभं राहिलं, तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्यावर अभद्र भाषेत टीका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचं खरं रूप समोर येतं. क्रांती, महिला म्हणून मी तुझ्यासोबत आहे" असं म्हटलं आहे.