"हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले" अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"जंतराव… निदान न कळणारी लबाडी तरी करा" असं म्हणत भाजपाने जयंत पाटलांवर (NCP Jayant Patil) बोचरी टीका केली आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता... आणि आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप…??? जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले"
एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे की, शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपाने केले आहे असा आरोपही त्यांनी केला. "आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतो. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील. उद्धव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असे असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने सुरू आहे."
""कपटाने आलेले कपटाने गेले"
"हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतेय, त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढतोय" असेही जयंत पाटील म्हणाले. याला भाजपाने आता उत्तर देत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ट्विटर अकाऊंटवरून याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. "कपटाने आलेले कपटाने गेले, जयंतराव जनतेने सरकार स्थापण्यासाठी ज्यांना मतदान केले होते, ते सत्तेवर आले" असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.