भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (NCP Supriya Sule) य़ांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सुप्रिया ताईंवर काय वेळ आलीय?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "सुप्रिया सुळेंना 2 दिवसांपूर्वी मोदींची काळजी वाटत होती, खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची" असं म्हणत खोचक टोला देखील लगावला आहे. चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. मी नेमकी कोण आहे, कुठे काम करते, हे त्यांनी लहान मुलांना समजावून सांगितलं. मी दोन कामं करते. मी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काम करते आणि मी तुमची खासदार आहे. तुमचे आई-वडील मला मतदान करतात ना? (मुलं हो…. म्हणतात..) कशावरून? घरून विचारून आला होतात का? आता घरी जाऊन विचारा… मागच्या वेळेला मतदान केलं नसेल तर 2024 मध्ये करायला सांगा.. आज घरी जाऊन हे माझं काम करा, असं सुप्रिया सुळे यांनी गंमतीत म्हटलं.
सुप्रिया सुळे यांनी यानंतर हा झाला गंमतीचा भाग, पण हे सांगण्यासाठी मी खरच येथे आलेले नाही, असं स्पष्टीकरणही दिलं. यावरूनच चित्रा वाघ यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "काय वेळ आलीये..? ज्ञानार्जन करणाऱ्या निरागस चिमुरड्यांना ‘आपल्या आई-वडिलांना मला मतदान करा’, हे सांगायची वेळ सुप्रिया सुळे ताईंवर आलीये..? याच ताईंना दोनच दिवसांपूर्वी मोदीजींची काळजी वाटत होती... खरी वेळ स्वतःची काळजी करण्याची आलीये तर…" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"