मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women Commission) राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाने चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका" असं म्हणत निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकरांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका... अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही. पण चाकणकरांची निवड झाल्याची चर्चा आहे.
"सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद??"
चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "आपल्या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत. यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींवरही टीकास्त्र सोडलं आहे. "अतिशय भयानक, काय चाललयं पुण्यात कोयत्याने वार करून खून, टाईप करतानाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तिने, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर, पोलीस कायदे कागदावर... महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद??" असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमधून विचारला आहे.
"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"
चित्रा वाघ यांनी आणखी एक ट्वीट करत प्रियंका गांधींवर (Congress Priyanka Gandhi) हल्लाबोल केला आहे. "हाथरसच्या घटनेवर तुम्हाला अश्रू अनावर झाले मग पुण्याच्या घटनेवर गप्प का?" असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. पुण्यातील ज्या तरुणीची हत्या झाली ती तुमच्या मुलीसमान नाहीये का? फक्त निवडणुका लागलेल्या उत्तर प्रदेशातच तुमच्या संवेदना जागृत होतात का?, सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
आणखी वाचा