मविआ सरकार सत्तेत आल्यापासून ते मविआ सरकार पडेपर्यंत संजय राऊत सातत्याने भाजपावर टीका करताना दिसले. त्यानंतर शिंदे गट वेगळ्या झाल्यावर त्यांच्यावरही राऊतांनी वेळोवेळी तोफ डागली. आम्ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहोत, असे संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजही म्हणताना दिसतात. याच दरम्यान बीडच्या जाहीर सभेत संजय राऊतांनी तुफान आक्रमक पवित्रा घेत शिंदे गटाला एक 'ओपन चॅलेंज' दिलं. य़ानंतर भाजपाने संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
"तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत" असं म्हणत खोचक टोला लगावला. तसेच "सत्तेच्या कैफात आंधळ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यांना ना जनतेच्या हालअपेष्टा दिसल्या, ना ४० आमदारांचे बंड!" असंही म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एरवी जमिनीपासून चार बोटे वर चालणारा तुमचा नैतिकतेचा रथ कालच्या एसी-सोफा-फर्निचर प्रकरणानंतर खाली घसरलेला साऱ्या महाराष्ट्राने पाहिलाय. म्हणे, आम्ही पांडव! तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत."
"पांडवांनी क्षत्रिय धर्माला जागत राज्यत्याग केला होता.. तुम्ही मात्र सत्तेसाठी हिंदुत्व धर्म सोडून विरोधकांच्या वळचणीला जाऊन बसण्याइतके लाचार झालात. खरं म्हणजे, तुमचे सर्वोच्च नेते आणि धृतराष्ट्र यांच्यात कमालीचं साम्य आहे. सत्तेच्या कैफात आंधळ्या झालेल्या त्यांच्या डोळ्यांना ना जनतेच्या हालअपेष्टा दिसल्या, ना ४० आमदारांचे बंड!" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"अहो सर्वज्ञानी, विचारांनी निर्धन असणारे तुम्ही काय प्रबोधन करणार..?? सुप्रीम कोर्टाने शिंदे-फडणवीस सरकार डिसमिस केलंय असा चक्क भर सभेत कांगावा करताय. खरं तर, जनतेने तुम्हालाच डिसमिस केलंय. त्यामुळेच पुन्हा खोट्या आश्वासनांची गाजरं दाखवून जनतेला लुबाडण्यासाठी ह्या महाप्रलोभन यात्रेचा तुम्ही घाट घातलाय पण जनता तुमच्या प्रलोभनाला भुलणार नाही..." असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. यासोबतच महा_प्रलोभन_यात्रा हा हॅशटॅग देखील वापरला आहे.