मुंबई - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आलं आहे. आसाम विमानतळावर पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४६ आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं म्हटलं आहे. याच दरम्यान भाजपाने बोचरी टीका केली आहे.
"हिसाब तो देना ही पड़ेगा ना" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जास्तीत जास्त काय होईल आमची सत्ता जाईल… इति सर्वज्ञानी संजय राऊत. खरं महाभारत तर त्यानंतरच सुरू होणार आहे सर्वज्ञानी संपादक महोदय. हिसाब तो देना ही पड़ेगा ना….।" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही…. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री" असंही म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. "काल काही फुटले, आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. "जय हो...विजय हो देवेंद्र फडणवीसजी" असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये "पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता" असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेलेले उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील देखील माघारी परतले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार परत आले आहेत.
"मला जबरदस्तीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि जबरदस्तीनं इंजेक्शन टोचण्यात आलं. मला हार्टअटॅक वगैरे काही आलेला नाही. सर्व खोट्या बातम्या", असं गुवाहाटीवरून परतलेल्या नितीन देशमुख यांनी मोठा आरोप केला आहे. "मी उद्धव ठाकरेंसोबतच आहे आणि राहणार. मी परत आलो आहे आणि बाकिचेही येतील अशी खात्री मला आहे. मी तिथं आमच्या मंत्र्यांसोबत गेलो होतो. पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी सुखरुप परतलो आहे", असं आमदार नितीन देशमुख म्हणाले.