मुंबई - राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. राज्यातील राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे. दरम्यान, यावर ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. “शिवसेना कदापि हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही. शिवसेनाप्रमुखांनी कानमंत्र दिलाय हिंदुत्व आमचा श्वास आहे. हिंदुत्वासाठी कोणी काय केलं हे बोलण्याची वेळ नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर आता भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही... गेल्या अडीच वर्षात किती वेळा याचं सारखं सारखं स्पष्टीकरण द्यावं लागतं यातच तुमचा फोलपणा कळतो ना...उद्धव ठाकरेजी" असं वाघ यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि हिंदुत्व हे गुंफलेले, जोडलेले शब्द आहेत. ते कदापि वेगळे होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांत काही जण अयोध्येलाही जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानभवनात बोलणारा कदाचित मी पहिला मुख्यमंत्री असेन असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
"जास्तीत जास्त काय होईल आमची सत्ता जाईल… इति सर्वज्ञानी संजय राऊत. खरं महाभारत तर त्यानंतरच सुरू होणार आहे सर्वज्ञानी संपादक महोदय. हिसाब तो देना ही पड़ेगा ना….।" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच "राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी महाविकास आघाडी सरकारला त्याचा थांगपत्ता ही लागला नाही…. हे असे सरकार आणि हे असे मुख्यमंत्री" असंही म्हटलं आहे.
"राज्याचा गृहराज्यमंत्री दुसऱ्या राज्यात पळून गेला तरी मविआ सरकारला थांगपत्ता लागला नाही"
चित्रा वाघ यांनी याआधी देखील ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. "काल काही फुटले, आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. "जय हो...विजय हो देवेंद्र फडणवीसजी" असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये "पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता" असं म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेलेले उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील देखील माघारी परतले आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे दोन आमदार परत आले आहेत.