मुंबई - विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले. मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं. आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तर, गुजरातमध्ये शिंदेंसोबत २५ आमदारांचा गट असल्याची सुत्रांची माहिती आहे. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे.
"काल काही फुटले, आज १३ झाले" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "काल काही फुटले, आज १३ झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात…" असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. "जय हो...विजय हो देवेंद्र फडणवीसजी" असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये "पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता" असं म्हटलं आहे. शिवसेनेच्या १० ते १२ आमदारांचा गट रात्री १० वाजता सूरतला पोहोचला आहे. तर, मंत्री एकनाथ शिंदेंसह इतर आमदार सूरतला पोहोचले असून एकूण २५ आमदारांचा गट गुजरातच्या सूरतमध्ये असल्याचे समजते. विशेष म्हणजे गुजरात भाजपकडून या आमदारांना सहकार्य आणि मदत करण्यात येत आहे.
गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हेही काल रात्रीच सुरतला पोहोचले होते. विशेष म्हणजे गांधीनगरमधील त्यांच्या नियोजित कार्यक्रमात बदल करून ते सुरतला पोहोचले असून सुरत हा पाटील यांचाच गड आहे. मात्र, अद्याप त्यांची शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यासोबत बैठक किंवा चर्चा झाली नाही. दरम्यान, शिवसेनेत मतभेद असल्याचं गुजरातमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटल्याची माहिती आहे.
राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. मात्र, भाजपाने विजय खेचून आणल सर्वांनाच धक्का दिला. त्यामुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. त्यातच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते.