मुंबई - भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी सामनातील अग्रलेखावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं उदाहरण" असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचं आहे की तुमचा कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करतो आहे. अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार...?" असा सवाल देखील वाघ यांनी विचारला आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"संजय राऊत यांचा सामनातला अग्रलेख म्हणजे त्यांच्यातील स्त्रीबाबत असणाऱ्या तालिबानी प्रवृतीचं हे उदाहरण आहे. अहो राऊत. एका महिलेवरती अमानवीय अत्याचार झालेला आहे. त्यामुळे तिचा ज्या यातनेने मृत्यू झाला असेल. तुम्हाला ते या जन्मातही समजणार नाही. अशा दुर्दैवी घटनेवरती राजकारणाची पोळी भाजण्यासाठी तिचा वापर करता आणि महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशची तुलना करता. नाकर्तेपणा तुमचा गुणधर्म झालेला आहे. फक्त भावनिक गप्पा झोडायच्या आणि मग घटनेनंतर म्हणायचे…ताई, घाबरू नका.. चिंता करू नका…हल्लेखोरांना शिक्षा होईल... आणि फक्त अशी भावनिक भुरळ घालायची...असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी "संजय राऊत, तुम्ही मुंबई सिपी केव्हापासून झालात, तपास पूर्ण व्हायच्या आधीच तुम्ही अग्रलेखातून अत्याचार करणारा ‘एकच’ नराधम होता असे घोषित करताय.. ही धडपड कुणाला वाचवण्यासाठी... की ही विकृती... मला सामनाच्या सर्वेसर्वा रश्मीताई ठाकरे यांना हेच विचारायचे आहे की तुमचा कार्यकारी अशा स्त्री अत्याचारी अमानवीय घटनेचा वापर राजकारणातील हेव्या-दाव्यांसाठी करतो आहे अशा तालिबानी प्रवृत्तीच्या तुम्ही मुसक्या कधी आवळणार...?" असं देखील म्हटलं आहे.
"विरोधकांकडे मुद्दे संपले की बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातंय"
चित्रा वाघ यांनी आपल्यावर टीका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. "विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातंय" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना…अन्यायाविरोधात पेटून उठा" असंही म्हटलं. "मला व माझ्या परिवारासाठी गलिच्छ भाषा वापरली जातीये तरीही.... मी कुणा परिवारातील सदस्यांना बलात्काऱ्याची बायको बलात्काऱ्याची मुलं म्हणून कधीही हिणवणार नाही कारण आमच्या बापाने हे आम्हाला शिकवलं नाही. विरोधकांकडे मुद्दे संपले की तिच्या बाईपणाला व तिच्या परिवाराला टार्गेट केलं जातंय. पण मला हे करण्याची आवश्यकता नाही माझ्याकडे सत्ताधाऱ्यांना गुद्दे द्यायला बरेचं मुद्दे आहेत. मला राज्यातील तमाम भगिनींना सांगायचयं…या भ्याड भेकडांना भीक न घालता कणखर बना… अन्यायाविरोधात पेटून उठा मी तुमच्यासोबत आहे आवाज उठवतीये व उठवत राहणारचं…!! जय हिंद !! जय महाराष्ट्र !!" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.