मुंबई - भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असं म्हणत निशाणा साधला आहे. "राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतेच आहे आणि आता तर अल्पवयीन-तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. चिमुकल्या जीवांशी खेळण्याची 30-30 हजारांत सौदेबाजी चालली आहे. कायदे कमजोर नाहीत. कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरला आहे. राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड" असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना वर्धा मधील आर्वी येथे घडली आहे. एका 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्याच्यात ती गर्भवती राहिली आणि आरोपीच तिला गर्भपातासाठी घेऊन गेला. 30 हजारांत व्यवहार झाला अशी बातमी 11 जानेवारी रोजी समजली. आर्वी पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली आणि धक्का बसला की, काही कवट्या, हाडं, गर्भपिशव्या त्या ठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथे सुरू होता. किती अवैध गर्भपात तिथे केले गेले? किती मुलांना मारलं गेलं? किती चिमुकल्यांची हत्या केली गेली? हे सांगता येणार नाही" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं पाहायला मिळतंय"
"सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती या ठिकाणी झाल्याचं वाटत आहे. मला आठवतंय की, सांगलीच्या म्हैसाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. या सगळ्या प्रकरणाचं मूळ जर पाहिलं तर ते कुठे ना कुठे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेकडे जातं आहे. कारण, या 13 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. माझ्याकडे अशा प्रकारे अत्याचार झालेल्या अनेक मुलींची यादी आहे. यामुळेच कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे."
"गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन योजना बनवली पाहिजे"
"मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवरती नक्कीच गृहविभाग आणि आरोग्य विभागाने एकत्रित येऊन एखादी योजना बनवली पाहिजे. कायदे हे कधीच कमकुवत नसतात परंतु त्याची अमलबजावणी करणारे मात्र कमकुवत झाल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणून या हरामखोरांना सोडता कामा नये, राज्यात 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्यातील कित्येक जणींसोबत असा प्रकार झाला असेल, याची भीती आता वाटते आहे. त्यामुळेच याची गंभीर दखल घेणं तितकच गरजेचं आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.