दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मनाविरोधात गेला म्हणून सरकारने तोच निर्णय संसदेत बहुमताच्या आधारे फिरवून दिल्लीवर कब्जा मिळविला. अगदी त्याचप्रमाणे संसदेने बोलाविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा, धनगरांना आरक्षण मिळवून द्या, असे आव्हान शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले. याच दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"तुम्ही तुमचा आख्खा पक्षच बसवला, बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी..." असं म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. तसेच "तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?" असा सवालही विचारला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"राजकीय रंग द्यायचा नाही म्हणता...पण नेमकं तेच करून सामाजिक सलोख्याचा तुम्ही बेरंग करताय उद्धवजी! आरक्षण प्रामाणिकपणे दिले म्हणता... पण न्यायालयीन कसोटीवर ते टिकणार नाही, अशी फट ठेवण्याचा अप्रामाणिकपणा कसा केलात उद्धवजी? तुमच्यावेळी लाठ्या उगारण्याची वेळ आली नाही म्हणता... आंदोलनकर्त्या एसटी कामगारांवर पडल्या, त्या काय होत्या उद्धवजी? सणांच्या दिवसांत अधिवेशन ठेवून आम्ही सणांना आडवं जातो म्हणता... पण मग तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवळं बंद ठेवून भक्तांना कसे आडवे गेलात तुम्ही उद्धवजी?"
"आम्हाला एक फुल- दोन हाफ आणि कारभार शून्य म्हणता... तुम्ही तर अडीच वर्षांत मंत्रालयाची पायरीही चढला नाहीत उद्धवजी! अजूनही स्वत:ची कुवत न ओळखता महाराष्ट्र उभा करतो म्हणता...तुम्ही तर तुमचा आख्खा पक्षच बसवला उद्धवजी! आज शांतीत भेटायला आलोय, असं म्हणता...मग उद्या पेटवण्याची भाषा कशाला उद्धवजी? बात निकलेगी तो बहोत दूर तक जाएगी उद्धवजी...!" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.