उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर तसेच भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपाचे हिंदुत्व दुतोंडी असल्याचा आरोपही केला. आगामी काळात सत्तेसाठी चंद्रयान, राममंदिराचा मुद्दा समोर आणतील, मंदिराच्या कार्यक्रमाला लोकांना नेऊन दंगली घडवतील, असे भाजपाचेच सत्यपाल मलिक व खा. महुआ मोईत्रा यांनी म्हटले. निवडणुकांसाठीच पुलवामा घडला होता, तेव्हा सावध राहा, असं उद्धव ठाकरे यांनी हिंगोली येथील सभेत म्हटलं आहे. यावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे.
"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय… काळजी घ्या उद्धवजी" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे फक्त फक्त थयथयाट. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे. आपली आता अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट... थयथयाट सुरू आहे."
"उद्धवजी मी मागील वेळेस तुमच्या जळजळीवर बरनोल पाठवलं होतं पण आता कळतंय की त्याचा काही उपयोग नाही. कारण तुमची जळजळ ही मानसिक आहे. तुमचा पक्ष संपल्यापासून तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय…. काळजी घ्या उद्धवजी" असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी देखील उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
"सर्वस्व गेलेल्या, निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न..."; उद्धव ठाकरेंना टोला
"सर्वस्व गेलेल्या आणि निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका उद्विग्न नेत्याचे हे उदगार आहेत! उद्धवजी, आपले सर्वस्व संपले आहे, हे आपणच मान्य करून टाकलं, हे एक बरं झालं! मतदार विचारत नाहीत, साथीदार साथ देत नाहीत अशा अवस्थेत तुमचा तोल ढळला आहे. एखाद्या मानसोपचारतज्ञाची तुम्हाला मदत घ्यावी लागेल असे वाटते. बघा तुमच्याकडे कोणी मिळते का?" असं केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.