जनतेच्या पैशांवर सरकार आपल्या दारी अन् थापा मारतंय लय भारी, अशी परिस्थिती सध्या आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी निर्धार सभेत केली. "शेतकऱ्यांना व ग्राहकांनाही योग्य भाव मिळवून देणे सरकारचे काम. मात्र, सरकारने कांदा उत्पादकांना छळले. तीच गत इतर मालांचीही आहे. एका अधिकाऱ्याने शेतकऱ्यांचा सर्व्हे केला. तेव्हा मराठवाड्यात १ लाखावर शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आढळले" असं ठाकरे म्हणाले.
"चांगले नेते तयार करण्याची ताकद भाजपमध्ये नाही. त्यांना नेते, कार्यकर्ते चोरावे लागतात. दिल्लीच्या वडिलांची किंमत राहिली नाही म्हणून माझे वडील चोरावे लागतात. इतर पक्षांतून नेते मागविणार असाल तर ही नामर्दानगी आहे" असं देखील ठाकरे यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजी... तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "तुम्हारा बस नाम बोलता है, हमारा तो काम बोलता हैं" असा खोचक टोला लगावला आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी! तुमची मशाल अन्याय जाळून टाकणारी नाही, तर स्वत:च्याच घराला भस्मसात करणारी आहे. भाजपद्वेषाच्या इंधनावर जळणाऱ्या या मशालीमुळे कधी तुमच्याच बुडाला आग लागेल, हे तुम्हालाही कळणार नाही."
"तुम्हारा बस नाम बोलता है, हमारा तो काम बोलता हैं"
"जपान दौऱ्यावरून देवेंद्रजींना हिणवताना मशालीच्या प्रकाशात स्वत:चा चेहराही न्याहाळा कोरोनाकाळात तुम्ही अडीच वर्षे घरात दडून बसला होतात, याचाही विसर पडू देऊ नका. तिथे जपानमध्ये असतानाही देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढला. जपानमध्ये उद्योगाबाबतचे करारही देवेंद्रजींनी केले. तुम्ही तर पुन्हा-पुन्हा वडिलांच्या नावाची उजळणी करून राजकारणात अस्तित्व टिकवण्याची धडपड करताहात, पण ती ही व्यर्थ आहे उद्धवजी... कारण, तुम्हारा बस नाम बोलता है, हमारा तो काम बोलता हैं..." असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.