उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत?, भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा! आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा" असं म्हणत टीकास्त्र सोडलं. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"उद्धवजी... आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही" असं म्हणत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चाललीय आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली..., तुम्ही सत्ता गमावल्याच्या दु:खाचं उट्टं काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खांदा वापरू नका" असंही म्हटलं. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी… आमचं सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अगदी तुम्हालाही नाही. आमचं सरकारच रयतेचं कल्याण आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे त्यामुळेच ट्रिपल इंजिन सरकार असूनही आमची गाडी व्यवस्थित चाललीय आणि तुम्ही मात्र डबल इंजिनाची गाडी गाळात घातली…"
"आम्ही राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. म्हणून सुरूवातीला ४० तालुक्यांपुरती असलेली दुष्काळाची व्याप्ती तातडीने कार्यवाही करत आणखी काही तालुक्यांतील १०२१ महसुली मंडळांपर्यंत वाढवली…आताही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणे युद्धपातळीवर सुरू आहे. सरकार पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कटिबद्ध आहे... तुम्ही सत्ता गमावल्याच्या दु:खाचं उट्टं काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खांदा वापरू नका..." असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
"मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे, मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार?" असा सवालही विचारला आहे.