उद्धव ठाकरेंनी राज्यात आणि देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना मोठी खंत व्यक्त केली. ज्या पद्धतीने राजकीय कुरघोड्या, पक्ष फोडाफोड्या सुरू आहेत, ती महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि वारसा नाही. इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री तातडीने दिल्लीवारी करतात, दिल्लीत मुजरा मारायला जातात. इर्शाळवाडीत एकीकडे मृतदेह बाजुला काढायचे काम सुरू असताना हे दिल्लीत जाऊन काय करतात, असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
"पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत... सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र...दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं, अलिबागचे 19 बंगले कुणाचे?" असा रोखठोक सवाल विचारला आहे.
चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच ट्विट केलं आहे. "उद्धवजी तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे, हे आम्ही जाणतो... पण त्याची झलक कुठं दिसली नाही राव. पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती. आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत... सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारं केविलवाणं चित्र... दोघांनीही मुलाखतीत आणलेलं उसणं अवसान मात्र बेस्टच…!पण काही प्रश्नांची उत्तरं घ्यायची राहिली बघा...."
"एखाद्या कणा असलेल्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर पोकळ बातांपेक्षा काही ठोस प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळाली असती... - कोविड घोटाळ्यात कंत्राटं कोणी ओरबडली?- कोविड घोटाळ्यात खैरातीसारखी कंत्राटं कुणाला वाटली?- पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातलं?- अलिबागचे 19 बंगले कुणाचे होते? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत, उद्धव जी ... यावर कधी बोलाल?" असा सवाल चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.