भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत पोहोचली आहे. आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत इंडिया आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीत उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी उपस्थित आहेत. याच दरम्यान भाजपाने यावरून उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल विचारला आहे. "अरेच्चा उद्धवजी! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान?" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच "काँग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेच राहुल गांधींच्या पदयात्रेत पाहायला मिळतंय" असंही म्हटलं आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अरेच्चा उद्धवजी…! हेच का तुमचं सावरकरप्रेम आणि बाळासाहेबांविषयीचा जाज्वल्य अभिमान? तुमचं खोटं प्रेम आणि बेगडी अभिमान काँग्रेसचरणी लोटांगण घालताना साऱ्या मराठी जनतेने आज पाहिला…"
"राहुल गांधी सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मुंबईभर फिरताहेत. पण, दोन स्थळांबद्दल मात्र त्यांना भलतीच ॲलर्जी... स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृती जागवणारं शिवतीर्थ..! काँग्रेस वारंवार या महामानवांना अपमानित करूनही उबाठा गटाला लाचारी काही सोडवत नाही. काँग्रेसची मुजोरी आणि उबाठाची ‘जी हुजुरी’ हेच राहुल गांधींच्या पदयात्रेत पाहायला मिळतंय…" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.