राम मंदिर हा मुद्दा आमच्यामुळे पुन्हा चर्चेत आला. पहले मंदिर फिर सरकार अशी घोषणा मी दिली होती. शिवजन्मभूमीची माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो त्यानंतर एका वर्षात कोर्टाचा निकाल आला. राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. जेव्हा माझ्या मनाला वाटेल तेव्हा रामाच्या दर्शनासाठी मी जाईल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनीभाजपावर निशाणा साधला. त्याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "उद्धवजी तुम्हाला पक्ष, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उद्धवजी…. पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरू देवेंद्रजींच्या पाठीशी आहेत. ज्यांनी ३७० कलम हटवलं, राम मंदिर उभारलं, सर्जिकल स्ट्राईक केला, जी२० यशस्वी आयोजिली, महिला आरक्षण दिलं... या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केलाय आणि शिष्याने राज्यात असंख्य संकटांवर मात करून पाच वर्षे यशस्वीपणे सरकार चालवून दाखवले."
"देवेंद्रजींचे गुरू कोण आहेत हे सर्व देशाला माहिती आहे. पण उद्धवजी तुम्हाला पक्ष सांभाळता आला नाही, राज्य सांभाळता आलं नाही, मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही… तुम्ही म्हणजे राजकारणातल्या अपयशी शिष्याचं नामुष्कीजनक उदाहरण आहात. तुमचे वडील तर हिंदुत्वाचं चालतं-बोलतं विद्यापीठ होते. त्या वंदनीय विद्यापीठाचंही शिष्यत्व काही तुम्हाला सांभाळता आलं नाही…" असं म्हणत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.
"राम मंदिराचे उद्घाटन करताय देशात सर्वत्र दिवाळी साजरी झाली पाहिजे असं म्हणता परंतु गेल्या १० वर्षात देशाचे दिवाळे निघालंय त्यावरही चर्चा करा. मी देशभक्त आहे. अंधभक्त नाही. राम मंदिर लोकार्पण होताना दिवाळी साजरी व्हायला हवी. त्यासाठी आम्ही नाशिकला चाललोय. कारसेवकांचे योगदान मोठे आहे. कारसेवकांनी धाडस केले नसते तर आज मंदिर उभं राहिले नसते. झेंडे लावायला अनेक येतात पण लढण्याची वेळ येते तेव्हा आपण कुठे होतो याचे उत्तर आज या लोकांकडे नाही" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.