उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "माता भगिनींची इज्जत लुटली जात आहे मात्र हे सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला असून मणिपूरच्या घनतेबाबत त्यांचीही संवेदनशीलता नाही" असे टीकास्त्रही देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ठाकरे यांनी सोडले. या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही" असं म्हणत पलटवार केला आहे. "उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…!" असं म्हणत घणाघात केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"राष्ट्रपती पदी आदिवासी महिला आहेत हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही. उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…! अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे तुम्हीं… टीका तर सोडा तुमची तर लायकीही नाही राष्ट्रपती पदाबाबत बोलण्याची… तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चाललंय, यावरून तुम्ही किती खालचा दर्जा गाठला हे ही कळतंय जनतेला…" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"...तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल"
भाजपाने उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "उद्धवजी तुमच्या हिंदुत्वविरोधी भूमिकेमुळे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिकाची मान शरमेनं खाली झुकली. मोदीजींना हुकूमशाह म्हणणारे तुम्ही सोनिया गांधींपुढे मात्र लोटांगण घालत आहात" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "तुमचे असेच नाट्य सुरू राहिले तर २०२४ नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.