मुंबई - यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे, ते आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपाची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी एक ट्विट केलं आहे.
"पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी" असं म्हटलं आहे. तसेच लडेंगे… .जितेंगे असंही त्यांनी सांगितलं. चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यात गाजलं होतं. पुण्यातील वानवडी भागात इमारतीतून उडी घेऊन ८ फेब्रुवारी रोजी पूजाने आत्महत्या केली होती. त्यानंतर काही ऑडिओ क्लिप्स समोर आल्याने व त्यात संजय राठोड यांचा आवाज असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागलं होतं. पूजाच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत असा थेट आरोप करत भाजपच्या महिला आघाडीने कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तोंड उघडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा भाजपने घेतला होता. त्यासाठी राज्यभरात आंदोलनही करण्यात आले.
विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संजय राठोड यांना अखेर पायउतार व्हावे लागले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्याच दिवशी राठोड त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता ते नव्याने मंत्री बनले आहेत. भाजपने ज्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलं होतं, ते संजय राठोड आता मंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे, भाजपची कोंडी होताना दिसून येते. कारण, विरोधकांकडून आता भाजपवर टिका करण्यात येत आहे. चित्रा वाघ यांनी याआधी अनेकदा संजय राठोड यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यानंतर आता "संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे" असं म्हटलं आहे.