शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचे नेते असून या नेत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करायला सांगितल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन केला. याच दरम्यान भाजपाने देखील यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
"शीतल तू लढ, आम्ही तुझ्यासोबत; हरामखोरांचा करविता धनी कोण?" असा संतप्त सवाल विचारला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबचत ट्विट केलं आहे. "शीतल…..तू लढ आम्ही सगळ्या तुझ्यासोबत आहोत. हा विषय फक्त शीतल पुरता मर्यादीत नाहीचं राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील मुंबई पोलिसांना आवाहन आहे या हरामखोरांना सोडू नकाचं पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा" असं म्हटलं आहे.
"राजकारणात काम करणाऱ्या महिलांना कशा प्रकारे त्रास देतात, हे आपण आतापर्यंत पाहिलं. आज सकाळी मी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचा मॉर्फ केलेला व्हिडीओ पाहिला. एखाद्या बाईला थांबवता येत नाही, तेव्हा तिच्या चारित्र्यावर प्रश्न उठवता. तिच्यावर बोललं जाईल, असे विकृत व्हिडिओ बनवले जातात, एकट्या शीतलचा हा प्रश्न नाहीय. आम्ही राजकारणात काम करतो. आज तिचा नंबर आहे, उद्या आमच्यापैकी कुणाचा लागेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे हा लढा सगळ्यांनी मिळून लढला पाहिजे. यांचा करविता आणि बोलविता धनी कोण आहे" असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडले तेव्हापासून मला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. तरीदेखील आम्ही उत्तर दिले नाही. मात्र आता झालेल्या प्रकाराने स्त्री म्हणून वेदना होत आहेत. ज्या पद्धतीने व्हिडीओ काढून त्यावर गाणे टाकून तो मातोश्री नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला, त्यानंतर ठाकरे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या पेजेसवर तो व्हायरल करण्यात आला. ठाकरे गटाकडूनच हा व्हिडीओ व्हायरल करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"