भाजपच्या मुलाखती : उपराजधानीत मामला टफनागपूर : लोकसभा निवडणुकीत मिळालेले घवघवीत यश विधानसभा निवडणुकीतही कायम राहील व राज्यात पुढच्या काळात युतीचीच सत्ता येईल, अशी आशा भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना असल्याने पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याचे प्रतिबिंब मंगळवारी झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीच्या वेळी दिसून आले. इच्छुकांनी एकच गर्दी केली. उत्साहाच्या भरात जिल्ह्यात सेनेसाठी सोडलेल्या तीन जागांवरही कार्यकर्त्यांनी दावा केला. निरीक्षकांनी मात्र हा दावा नव्हता, तर पक्षबांधणीसाठी चर्चा होती, असे नंतर पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे निरीक्षक आमदार आशिष शेलार आणि प्रदेश सरचिटणीस अतुल भातखळकर मंगळवारी नागपुरात आले होते. त्यांनी रविभवन सभागृहात सकाळी १० वाजतापासून मुलाखतींना सुरुवात केली. रात्री १० वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. प्रथम ग्रामीणमधील सहा व नंतर शहरातील सहा मतदारसंघातील इच्छुकांशी निरीक्षकांनी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दोन्ही जागा अनुक्रमे भाजप आणि शिवसेनेने प्रचंड मताधिक्याने जिंकल्या. लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी इच्छुकांच्या मनात आमदार होण्याची इच्छा बळावणारी ठरली. त्यामुळेच सर्वच विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या वाढली. जिल्ह्यात काटोल, रामटेक आणि शहरात दक्षिण नागपूर हे तीन विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. त्यापैकी रामटेकमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार आहे. रामटेकच्या मुलाखती सुरू होत्या तेव्हा रविभवनात सेनेचे आमदार उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथून अविनाश खळतकर यांनी दावेदारी पुढे केली. मात्र निरीक्षक आशिष शेलार यांनी आम्ही रामटेक व काटोल मधून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले नाहीत, महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची सूचना त्यांना केली, असे स्पष्ट केले.(प्रतिनिधी)
सेनेच्या जागांवर भाजपचा दावा
By admin | Published: August 06, 2014 1:13 AM