मुंबई : राज्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण (OBC Reservation) रद्द झाल्याने बुधवारी राज्यभरात भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे फोटो शेअर करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात केलेल्या विश्वासघाताच्या विरोधात भाजपाच्यावतीने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने नेते-कार्यकर्ते यात सहभागी झाले आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, या जागांवर भाजपा यशापयशाची पर्वा न करता केवळ आणि केवळ ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल, अशी घोषणा आम्ही यापूर्वीच केली आहे. ओबीसी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा कटिबद्ध आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपातर्फे राज्यभरातल्या विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी भाजपा आक्रमक झालेले दिसून आले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नागपूरच्या मानेवाडा चौकात चंद्रशेखर बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. तसेच, पोलिसी बळाचा वापर करुन ओबीसी आरक्षणासाठीचे आंदोलन चिरडले जात असल्याचा आरोपही भाजपा आंदोलनकर्त्यांनी केला.